MIM ची उलटी गिनती सुरु, बडतर्फ नगरसेवक सय्यद मतिन यांचा पलटवार

Foto

औरंगाबाद -  ऑल इंडिया मजलीस इत्तेहाद ऊल मुस्लीमीनचे (एआयएमआयएम) वादग्रस्त नगरसेवक सय्यद मतीन यांची पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर त्यांनी पक्षातील नेत्यांवर पलटवार केला आहे. आता एमआयएमची उलटी गिनती सुरु झाली असल्याचा इशारा त्यांनी आपल्या खास शैलीत दिला. पक्षातील अंतर्गत राजकारणाचा मी बळी ठरलो असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासोबतच एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांचे नाव न घेता त्यांच्यावरही निशाणा साधला.

 मागील अनेक दिवसांपासून गायब असलेले नगरसेवक सय्यद मतीन मंगळवारी मनपाच्या सर्वसाधारण सभेत प्रकट झाले. मतीन सभागृहात दाखल झाल्याबरोबर भाजप सदस्यांच्या मागणीनंतर महापौर नंदकुमार घोडेले यांनी त्यांना सभागृहाबाहेर जाण्यास सांगितले. महापौरांच्या आदेशाचे पालन करत कोणताही विरोध न करता मतीन सभागृहाबाहेर पडले. मात्र त्यांनी सर्वसाधारण सभेसाठीच्या रजिस्टरवर आपली उपस्थिती नोंदवलेली होती. सभागृहात उपस्थित राहाण्याचा आपला अधिकारही त्यांनी बजावला होता.

एमपीडीए कारवाईनंतरच पक्षाने मला दूर लोटले

महापौरांनी सांगितल्यानंतर सभागृहाबाहेर पडलेल्या मतीन यांना पक्षाने केलेल्या बडतर्फीच्या कारवाईवर विचारले असता ते म्हणाले, माझ्यावर धुळे महापालिका प्रचारासाठी न गेल्याचा ठपका ठेवण्यात आला, मी माझ्या काही वैयक्तिक कारणांमुळे तेथे जाऊ शकलो नाही. माझ्यावर दुसरा आरोप लावण्यात आला की पक्षाच्या ध्येयधोरणाविरोधात मी काम करतो. यावर मी सांगू इच्छितो की माझ्या इतके पक्षाच्या ध्येयधोरणनुसार कोणीच काम केलेले नाही.

पक्षाने केलेल्या कारवाईचा आनंदच असल्याचे सांगत मतीन म्हणाले, माझ्यावर एमपीडीएनुसार कारवाई करण्यात आली, तेव्हाच खऱ्या अर्थाने पक्षाने माझी साथ सोडली होती. मी तेव्हाच पक्ष सोडायला पाहिजे होता. मात्र मी वाट पाहात होतो की पक्ष माझ्यावर काय कारवाई करतो. सोमवारी मला पक्षातून बडतर्फ करण्यात आले, त्याचा मला आनंदच आहे.

पुढील रणनीती स्पष्ट करताना मतीन म्हणाले, मी काम करणारा कार्यकर्ता आहे. माझ्या कार्यकर्त्यांशी आणि वार्डातील ज्येष्ठांसोबत चर्चा करुन यापुढे कोणत्या पक्षात जायचे याचा निर्णय केला जाईल. मात्र आजपासून एमआयएमची उलटी गिणती सुरु झाली आहे. यापुढे औरंगाबादमध्ये एमआयएमला स्थान राहाणार नाही, असा इशारा मतीन यांनी दिला. त्यांच्यावर झालेल्या कारवाईसाठी त्यांनी पक्षाचे स्थानिक आमदार इम्तियाज जलील जबाबदार असल्याचे त्यांचा नामोल्लेख टाळून सांगितले.